Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या

Chhagan bhujbal: दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील प्रश्नावर, तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय? असे म्हणत जरांगेंवर हल्लाबोल केला.
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्या भूमिकेवरुन पक्षप्रमुख अजित पवार नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असते. त्यातच, अजित पवारांच्या (Ajit pawar) उपस्थितीत मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवार
विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी जाहीर केल्याचेही समजते. मात्र, अजित पवारांच्या या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण लढ्यासंदर्भातील आपली स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे म्हटले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्यासंदर्भातील प्रश्नावर, तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय? असे म्हणत जरांगेंवर हल्लाबोल केला.
”अजित पवार मला काही बोलले नाहीत, मला बोलायचं असतं तर ते थेट बोलले असते, असे म्हणत अजित पवारांची आपल्यावर कुठलीही नाराजी नसल्याचे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच, मी अजित पवारांना स्पष्ट बोललोय, मी 35 वर्षांपासून समाजासाठी काम करतोय. मी शिवसेना त्याच कारणाने सोडली होती. ते काम मी कुठंही गेलो तरी चालूच राहणार, त्यास मला कुणाचंही बंधन नाही. मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही,” असेही छगन भुजबळ यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना सांगितले.
अजित पवारांनी साप पाळले आहेत, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते, त्यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय? त्याला काही काम धंदा नाही, त्याला शिक्षण आहे का? काही माहीत आहे का? असे भुजबळ म्हणाले. मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलाय, 57 वर्षे झाले मला, मी मुंबईचा दोनदा महापौर झालो. मंडल आयोगामुळे काँग्रेसमध्ये गेलो, त्याला राजकारणात कोण कधी आलं माहीत आहे का?. 1991 साली मी कॅबिनेट मंत्री झालो, जे आज मंत्री आहेत तेव्हा कोणीही नव्हतं, असा पलटवार भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केला. तसेच, माझ्या भूमिकेला मनातून सर्वांचेच समर्थन आहे, मराठा समाजाला इडब्लूएसचे आरक्षण दिल्यानंतर सर्व प्रश्न मिटले होते. मात्र, हा दारुवाले आणि वाळूवाल्यांचा लिडर, हा लढाया, मारामाऱ्या करायला लिडरशिप करतोय. देशातल वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झालाय. त्याला अक्कलच नाही, त्याच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला.

